आईचा वाढदिवस आणि माझी कविता...

आज-काल गल्लोगल्ली लागणाऱ्या पुढाऱ्यांच्या पोस्टर्सवरून "प्रेरणा" घेऊन, मागच्या वर्षी मी आणि स्नेहलने आईच्या वाढदिवसासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं! त्यात एक कविता होती - वेबवरून "उचललेली". तेव्हाच माझ्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात, माझ्याच नकळत, मी ठरवलं होतं - पुढच्या वर्षी मी कविता करणार!

मागच्या वर्षी आम्ही बनवलेलं ग्रीटिंग कार्ड 

मधल्या काळात दिवस भरभर निघून जात होते. आणि जे स्वप्नात सुद्धा घडू नये, ते घडलं! सलग दुसऱ्यांदा मी आई-पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस विसरलो होतो... :( १० जून जवळ येत होता, आणि मी "कविता करायची" हे विसरून गेलो होतो. स्नेहलला सांगून ठेवलं होतं, वेब वर एक चांगली कविता पाहून ठेव - ग्रीटिंग वर लिहायला. पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणतात त्याप्रमाणे स्नेहलला काही चांगली कविता सापडत नव्हती, मलाही नव्हती सापडत. आणि मग मनाचा "तो" कोपरा जागा झाला! या वर्षी मी कविता करणार! 

एक खोडकर विचार मनात आला... हॅट्-ट्रिक करूया की! आणि ठरलं - वाढदिवस विसरायचं नाटक करायचं. रात्री उशिरा आईला कविता आणि ग्रीटिंग द्यायचं. कवितेचा शेवट "मी तुझा वाढदिवस कसा बरं विसरेल?" असा आशय असणाऱ्या ओळींनी करायचा. मग काय, प्लॅन होता, कवितेचा शेवट होता, पण कविता कुठे होती?

३० एप्रिल, वाढदिवसाला १२ दिवस... सकाळी लवकर उठलो होतो आणि साडेसहाला ऑफिसला निघालोही होतो! अत्यंत प्रसन्न वातावरण, आणि सकाळची वेळ. आभाळ ढगांनी दाटून आलेलं, थंडगार वाऱ्याची हळुवार झुळूक, मधूनच अचानक पडणारा तो पावसाचा एखादा थेंब, दिवसाच्या तुंबणाऱ्या वाहतुकीपासून मुक्त पहुडलेले, रात्रीच्या पावसाने लख्ख धुतलेले ते काळेशार आखीव रस्ते... अशा वातावरणात कविता सुचणार नाही तरच नवल! तेव्हा आणि नंतरच्या काही दिवसांत मिळून कविता लिहून काढली. कविता कसली ती? सहा "दोनोळयांचा" एक गठ्ठाच तो! जश्या चार ओळींच्या चारोळ्या, तशाच दोन ओळींच्या "दोनोळया"! :P 
माझ्या आईच्या मायेची जगी नाही कुठे तोड
माझ्या आईची ती बोली गुळापुरणाहून गोड

चिमुकल्या या पंखांना आई दिलेस तू बळ
शिकवलेस आम्हाला काय क्षीर काय जळ

रोज दावी सूर्योदय उठोनिया लवकर
निजवताना यायच्या रोज गायी पाण्यावर

तुझ्या विना नसे आई, एक निबंध-भाषण
तुझे हस्ताक्षर असे माझ्या वहीचे भूषण

सुगरणीस वरचढ माझ्या आईचा तो हात
दोसा तुझ्या गं हातचा करी अमृतावर मात

लाडाकोडाचा 'नकटा' हा तुझा गं 'सुजुराजा'
कसा विसरेल बरं दिस वाढदिवसाचा ?
('नकट्या' आणि 'सुजुराजा' ही माझ्या आईची दोन आवडीची संबोधनं!)

कवितेत काही ठिकाणी मी आई बद्दल सांगत आहे, तर काही ठिकाणी मी तिच्याशी संवाद साधतो आहे. पण म्हणतात ना, "युद्धात आणि कवितेत सारं काही माफ असतं" (म्हणतात ना? :P), मग राहू दिलं तसंच.

मी लहान असताना आई मला रोज सकाळी लवकर उठवून सूर्योदय दाखवायला गच्चीवर घेऊन जायची. सकाळच्या हवेतला तो थंडावा, गडद निळ्यापासून तांबड्या, आणि तांबड्यापासून सोनेरी रंगात होणारं आकाशाचं ते संक्रमण... अजूनही जसंच्या तसं आठवतं. जी गोष्ट सकाळची, तीच रात्रीची. रोज रात्री आई मला झोपी घालवण्यासाठी तिच्या आवडीच्या कवितांमधली एक कविता म्हणायची. "गायी पाण्यावर काय म्हणून आल्या", "लाडकी बाहुली होती माझी एक" आणि "गवतफुला रे गवतफुला" या कविता म्हणजे माझ्यासाठी अंगाई गीते! अर्थ जरी कळला नाही, तरी छान वाटायचं ऐकायला.

मी शाळेत असताना निबंध असो की भाषण, आईशिवाय माझं (आणि माझ्या वहीचंही :P) पान नाही हलायचं! भाषणात बोले मी, पण बोल असायचे आईचे! आणि जून महिन्याची सुरवात म्हणजे तर एक खास कार्यक्रमच. नव्या वह्या, नवी पुस्तकं - मी बैठक मांडून साऱ्यांवर आईकडून नावं आणि सुविचार टाकून घ्यायचो. काय शान वाटायची त्या वह्या वापरताना...

आणि आईच्या हातच्या दोश्याची चव काय सांगावी... पोट भरायचं, पण मन नाही! मी दहावीत असताना आम्ही पैज लावली होती, आई दर रविवारी दोसा बनवणार, आणि मग बघायचं - ती बनवायला कंटाळते की मी खायला! बरोबर ओळखलंत - मी जिंकलो!

7 comments :

 1. Why don't you translate it also, or at least write a brief description of the post in English? I want to read, but have no time/enthu to learn maraTI now!

  Reply Delete
  1. I can understand that, but the post is kind of an essay and I am not sure whether I can convey the same with my limited English vocabulary. And though I can explain the meaning of the poem, it will lose its rhyme and meter. I had actually started translating it, but gave up in midway.

   Delete
 2. Try posting it in good old SujeetRap.

  Reply Delete
 3. लैई भारी भावा , माझ्या तर्फे सुद्धा काकुनला वाढदिवसाच्या शुभेय्चा :)

  Reply Delete
 4. Hey...
  my father sent me ur blog after reading about ur package :P

  i study in IIT kgp and i haven't even been placed yet. so u can imagine my feelings before reading it :P I was soo damn frustrated !

  but then, i saw something in marathi.... that too about mother and the poem... n guess what? I felt so good after reading it!! my mother used to teach me all those poems ! 'rang rangulya san sanulya gavatfula' this ones my fav !!!
  u made my day :)

  n btw congrats for getting placed ! (not for the package :P)

  Reply Delete
  1. Thanks for the wishes! :) Nice to know you liked the poem and it made an emotional connect! That's the best compliment one could get on a poem!
   And yeah! Totally agreed! "Gavatfula" : my favorite too! :)

   Delete
 5. Sujeet.. Kharach manala Bhava tula..
  Kay Jabardast ahe Rao Tu..
  Ajch Fb var vachala ki IIT-Madras chya mulane 82LPA ch package Dhudkavala..
  Mhatala ithe amhala Job ch Nahiye ani Baghav ha
  Pattha Kon ahe.. Bghitala tar To Ek Marathi Mualaga Nighala..
  Ani Kaharch tu worth Appreciable decision Ghetalas hoy..
  Keep It Up.. Wish u a great Future Ahead.
  Ani vel milalach tar plz mail var contact kr.
  girishpatil607@gmail.com

  Reply Delete

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.